Tuesday, September 28, 2010

मोरझोतच्या धबधब्याला आता कुडपणच्या धबधब्याचा पर्याय


मोरझोतच्या धबधब्याला आता कुडपणच्या धबधब्याचा पर्याय
शैलेश पालकर
पोलादपूर तालुक्यात वर्षासहलीसाठी पर्यटकांना आता नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ उमरठपासून जवळच असलेल्या खोपड-चांदके रस्त्यावरील मोरझोत धबधब्याला नवा पर्याय उपलब्ध झाला असून यावर्षीपासून थंड हवेचे हिलस्टेशन कुडपण येथील धबधबा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. 'गिरीचे मस्तकी गंगा, तेथूनी चाललीया बळे' असे समर्थ रामदासस्वामींनी केलेले कोकणातील गिरीशिखरांवरून पावसाळयात वाहणा-या धबधब्यांचे हे वर्णन उमरठजवळच्या खोपड-चांदके रस्त्यावरील मोरझोत धबधब्याला जसे चपखल बसते; ते कुडपणच्या या दुधाळ धबधब्याला तर हे वर्णन तो धबधबा पाहूनच रामदासस्वामींनी केले असावे, असे वाटते. ब्रिटीशांनी कुडपणचा उल्लेख हिलस्टेशन असा केलेला आहे. उमरठ परिसर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी तर योगायोगाने कुडपण हे शेलारमामांचे गांव असल्याने मोरझोतचा धबधबा उमरठजवळ आणि तसाच दुसरा धबधबा कुडपणजवळ असल्याचे आश्चर्य निश्चितच वाटते. घागरकोंडच्या नदीच्या पात्रातच असलेला नायगारा सदृश्य जलप्रपात पाहण्यासाठी झुलता पूल येथे जाणारे पर्यटक आता तेथे जवळच वाकण ग्रुपग्रामपंचायतीने स्मशानओटा बांधल्याने तेथे जाण्यास फारसे उत्सुक नसतात.मोरझोत धबधबा हा खोपड ते चांदके रस्त्यालगतच असल्याने सुगम आहे. परंतु, तेथे जाण्यासाठी अलिकडेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा रस्ता जीर्ण होऊ लागल्याने तसेच उमरठपर्यंतचा रस्ता पक्का नसल्याने वर्षासहलींमधून येणा-या तसेच मोटारसायकलस्वार पर्यटकांना कंबरडे ढिले करणारा अनुभव घ्यावा लागतो. मात्र, कुडपणचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अलिकडेच पूर्ण झाला असून पोलादपूरच्या लेप्रसी मिशन हॉस्पिटलपासून चोळई नदीच्या पुलालगत मोरगिरी, देवपूरमार्गे क्षेत्रपाळपर्यंत व तेथून पहिले कुडपण, मधलीवाडी असा सहज प्रवास करून भिमाच्या काठीपर्यंत गेल्यावर या दुधाळ धबधब्याचे मनमोहक रूप पाहण्यास मिळते. या धबधब्याचे रस्त्यावरून दर्शन जेवढे सुखद आहे. त्याहीपेक्षा अधिक अत्यानंद या धबधब्यापर्यंत डोंगरकडयांतून वाट काढून पोहोचल्यावर त्याखाली सचैलस्नान करण्याने होतो. हवेत 'ॠतू हिरवा...'पासून 'झोंबतो गारवा...' असा विलक्षण आनंद घेत जवानीचा कारवाँ मजल-दरमजल करीत परतीच्या प्रवासास निघतो आहे.

पोलादपूरमधील पुनर्वसन


पोलादपूरमधील पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्याचे 'वाजले की बारा!'
शैलेश पालकर
२५ व २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टी, महापूर आणि भूस्खलनानंतर तालुक्यातील कोतवाल बुद्रुकमध्ये ६, कोतवाल खुर्दमध्ये ३ आणि लोहारमाळ-पवारवाडीमध्ये २ जणांचा जमिनीत गाडले गेल्याने मृत्यू झाला. याकाळात बेघर झालेल्या दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी तत्कालीन आमदार माणिकराव जगतापांनी यशस्वीरित्या समाजसेवी संस्थांच्या मदतीने राबविलेल्या 'देशास आदर्शवत् पुनर्वसनाच्या महाड पॅटर्न'असे मुक्तकंठाने कौतुकही केले. मात्र, कोंढवी आणि कोतवाल येथे सिध्दीविनायक ट्रस्टच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पुनर्वसन संकूलाचा ताबा दरडग्रस्तांना देण्यापूर्वीच तसेच तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यापूर्वीच या संकुलांचा जिर्णोध्दार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाडमध्ये बव्हंशी यशस्वी ठरलेल्या पुनर्वसनाच्या पॅटर्नपासून जवळचाच पोलादपूर तालुका मात्र वंचित राहिला आहे.पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात पोलादपूर तालुक्यातील बोरावळे येथील ९ घरांच्या बांधकामानंतर तेथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले. सावित्री महिला विकास संस्थेतर्फे पैठण गांवात ३, देवपूर येथे ४, पार्ले येथे ३, माटवण येथे ५, पोलादपूर- जोगेश्वरी गाडीतळ येथे ३, सडवली येथे ६, लोहारमाळ येथे ४, रानबाजिरे येथे २३, आड येथे २, सवाद येथे १ आणि हावरे येथे ६ अशी एकूण ६१ घरकुले बांधण्यात येऊन ताबाही देण्यात आला. पोलादपूर येथील चित्रे यांना घरबांधणीसाठी सरकारी अनुदान देण्यात आले. तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांचे पुनर्वसनकामी तब्बल ४८ सरकारी परिपत्रकांमध्ये बदल केल्याने प्रयत्न अभ्यासपूर्ण असल्याचे दिसून आले.याखेरिज, कोतवाल खुर्द आणि बुद्रुकच्या दरडग्रस्तांसाठी २८ घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र तर कोंढवी येथे २९ घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र उपलब्ध करण्यात येऊन पुनर्वसनाचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले. सिध्दीविनायक ट्रस्ट, मुंबईने याकामी खर्चाची जबाबदारी उचलली. कोतवालमध्ये दरडग्रस्तांची संख्या ४८ तर कोंढवी येथे ७८ कुटूंबे अशी असताना दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ४५ लाख रूपये खर्चातून केवळ १५-१५ घरकुलं उभारण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षांत कोतवाल येथे घरकुलांपर्यंत जाणारा रस्त्यासाठी भूसंपादन करण्याकामी तत्कालीन तहसिलदारांनी केलेली कुचराई रायगड जिल्हाधिकारी यांनी सिध्दीविनायक ट्रस्टचे विश्वस्त सुभाष मयेकर यांच्याहस्ते ५० लाखांचा धनादेश प्रदान करतेवेळी नाराजीसह उघड केली. मात्र, त्यानंतर कोंढवी आणि कोतवाल येथील घरकुलांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याऐवजी ती दिवसेंदिवस खालावत गेली. येथे वीज, पाणी, रस्ते, शाळा अशा मुलभूत सुविधांचा पुनर्वसन कार्यक्रमामध्ये समावेश असूनही त्याबाबत कार्यवाही झाली नाही. यातून ही घरकुलं दरडग्रस्तांना ताबा दिल्याविना ओसाड राहून ढासळू लागली. ठेकेदारांकडून त्याकडे दूर्लक्ष होऊ लागले. दुस-या टप्प्यात मिळालेली रक्कम झालेल्या कामापोटीच मिळाली असे सांगून ठेकेदार त्याठिकाणी फिरकेनासेही झाले.गेल्या वर्षभरात कोंढवी व कोतवालच्या पुनर्वसन कामाकडे संबंधित ठेकेदार, पुनर्वसन यंत्रणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेल्या दूर्लक्षामुळे आता ही घरकुलं छप्पर फाड के गळणा-या पावसाने आतूनही ओलीचिंब झाली आहेत. घरकुलांच्या भिंती भिजून ओघळू लागल्या आहेत. परिसरात गवत माजले आहे. रस्त्यासह कोणत्याही नागरी व मुलभूत सुविधा येथे उपलब्ध झाल्या नसल्याने आता तेथे झालेल्या अक्षम्य दूर्लक्षाच्या खुणा स्पष्ट दिसू लागल्या आहेत. तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांच्यामुळे 'पुनर्वसनाचा आदर्शवत पॅटर्न'ठरू पाहणारी ही घरकुलं मतदार संघातील समस्यांकडे तसेच सरकारी यंत्रणांकडे लोकप्रतिनिधींचे दूर्लक्ष झाल्यास सरकारच्या तसेच समाजसेवी संस्थांचा पैसा पाण्यात जातो, याचे ओलेचिंब तरीही ज्वलंत उदाहरण ठरत आहेत.